लालूंची अलिशान कैद!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2017
Total Views |
 
 
 
खरंच हा देश अजब आहे. नुसताच अजब नाही, तर गुलामांचा देश आहे हा. कमालीच्या पराभूत मानसिकतेत जगतात लोक इथले. एकतर एखाद्याला डोक्यावर बसवताना त्याची लायकी लक्षात घेत नाहीत अन् एकदा बसवलंच डोक्यावर की, त्याची पत लक्षात असूनही त्याला जाब विचारण्याची हिंमत कुणी करीत नाही. अशा तर्‍हेने, लोकांनी अकारण डोक्यावर घेतलेली माणसंही मग सुसाट सुटतात. बेताल वागतात. ज्यांनी मानसन्मान दिला, सत्तेतली पदं बहाल केली त्यांनाच पायदळी तुडवतात. पथभ्रष्ट होत बिनधास्तपणे सत्तेचा दुरुपयोग करतात. दुर्दैव असे की, अशा पथभ्रष्ट झालेल्यांना ताळ्यावर आणण्याची गरज इथल्या व्यवस्थेला, सर्वसामान्य जनतेलाही वाटत नाही. म्हणूनच मग असल्या बड्यांच्या बेछूट वागण्यावरही टाळ्यांचा कडकडाट करतात सभोवतालचे लोक. त्यांच्या अर्थहीन बरळण्यानेही मैफल सजते फुकाची. त्यांनी भ्रष्टाचार केला, कोट्यवधी रुपयांचे गबन केले, लोकांच्या हक्कावर गदा आणली, अधिकारांचा गैरवापर केला, तरी त्या सर्व बाबींचा विसर पडून कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर होत राहतो.
 
राजकारण असो वा क्रिकेट, चित्रपट असो वा उद्योगजगत, तिथे वावरणार्‍या लोकांना तर काहीही करण्याची मुभाच बहाल करून टाकलेली असते, त्यांच्या सभोवताल जमलेल्या षंढांच्या फौजेने. इथल्या सामान्य जनतेला तर तसेही कुणी विचारत नाही. देशावर आणिबाणी लादणार्‍या इंदिरा गांधींना, नंतरच्या काळात पंतप्रधानपदी ससन्मान विराजमान करण्याची बाब असो, की चारा घोटाळ्यात दोषी आढळून आल्याने शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांच्या, कारागृहातील दिनचर्येवर सध्या चाललेला रंगतदार चर्चेचा बहर असो, खरंच साराच दुर्दैवी प्रकार आहे... आपल्या चुकीच्या कृत्याची शिक्षा झाली असल्याची त्यांनाही लाज वाटत नाही थोडीशी अन् जनतेलाही त्यांच्या त्या वागण्यात कुठला प्रमाद जाणवत नाही कुठेच. जणू काहीच घडलेले नसल्याच्या थाटातले निर्लज्ज वागणे चालले आहे- त्यांचे, त्यांच्या समर्थकांचे अन् भाबड्या जनतेचेही. जणूकाय भलीमोठी कर्तबगारी बजावूनच जेलमध्ये गेलाय् हा माणूस! त्या घोटाळ्याचं काय, असा सवाल विचारण्याची गरज कुणालाच वाटत नाहीय् इथे?
 
लालूप्रसाद यादवांनी परवा जेलमध्ये कसा स्वयंपाक केला, गुलाबी थंडीत त्यांनी तास-दोन तास उन्हात कसे घालवले, त्यांच्यासाठी पाटण्याहून गुटखा कसा मागवण्यात आला अन् दूरवरच्या दरभंग्यातील शेतातून हिरव्यागार भाज्यांचा रतीब कसा त्यांच्या सेवेत सादर केला जातोय् याचे रसभरीत वर्णन... त्यांच्यासाठी उपलब्ध होणारी सकाळची वर्तमानपत्रं, दिवाणखान्यातला टीव्ही, वामकुक्षी आटोपल्यावर दुपारी त्यांना म्हणे भेळ लागते चहाच्या सोबतीला! मग भेळेची व्यवस्था करून द्यायला सभोवतालची यंत्रणा धावली नसती तरच नवल! जरासे निवांत बसले लालू यादव, की मग कैद्यांची गर्दी जमते म्हणे त्यांच्या सभोवताल अन् मग मस्तपैकी रंगते ती गप्पांची मैफल. दरबारच भरतो म्हणा ना साहेबांचा! लालूंसारखेच वेगवेगळ्या गुन्ह्यात तोंड काळे केलेले तिथले इतर कैदीही मग आपली गार्‍हाणी घेऊन हजर होतात. आपापल्या समस्या साहेबांपुढे मांडतात अन् हा चाराखाऊ भ्रष्ट नेता त्या समस्या सोडवण्याची हमी देतो सर्वांना. मुर्दाड अधिकार्‍यांची हतबल फौज मुकाट्यानं सारा तमाशा बघत राहते. त्या मैफलीतली गर्दी, तिथे रंगलेला गप्पांचा फड आवरण्याची जबाबदारी चालून येते ती तिथल्या सुरक्षारक्षकांवर...
 
बघताय् ना कसला तमाशा चाललाय् तो? लालू कारागृहात आहेत की पिकनिकवर? ते निम्न दर्जाचे भ्रष्टाचारी आहेत की उच्चस्तरीय स्वातंत्र्यसंग्राम सैनिक? घोटाळा केला म्हणून त्यांना गजाआड धाडण्यात आले, की देशासाठी केलेल्या कुठल्याशा त्यागासाठी परकीयांनी त्यांना ही शिक्षा दिलीय्?
 
लोकांची फसवणूक करणार्‍या सहारा कंपनीचे सुब्रतो रॉय असोत, की बिहाराचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, लोकांची फसवणूक, सार्वजनिक मालमत्तेची लूट केल्याबद्दलची शिक्षा ज्या अलिशान पद्धतीने ते भोगताहेत, ज्या पद्धतीने सुब्रतो रॉय यांच्यासाठी दिल्लीतल्या अन् लालूप्रसाद यादवांसाठी रांचीच्या कारागृहातल्या वास्तव्याकरिता त्यांच्या गरजा पूर्ण करणार्‍या तारांकित सुविधांचा धोधो पाऊस, डोळे असून आंधळ्याचे सोंग वठविणार्‍या यंत्रणेच्या नाकावर टिच्चून पडतोय्, तो खरोखरच दुर्दैवी आहे. एसीपासून तर पलंगापर्यंत, शेतातल्या भाज्यांपासून तर गुटख्यापर्यंतच्या गोष्टी बाहेरून आणण्याची विशेष परवानगी कायदा खुंटीवर टांगून, नियमांची खिल्ली उडवत बहाल करण्याची तर्‍हा नेमक्या कुठल्या विशेष कर्तबगारीसाठी या धेंडांकरिता अनुसरण्यात आली आहे, हे कळू शकेल लोकांना? की घटनेत तरतूद केलीय् कुणी, या देशातल्या राजकीय नेत्यांनी, बड्या उद्योजकांनी, सलमान खानसारख्या चित्रपटाचा धंदा करणार्‍या दिवट्यांनी गुन्हा केला असेल, तो सिद्ध झाला असेल, तरी त्यांना शिक्षा होऊ नये याची? लोकलाजेस्तव, नाइलाजाने घोषित करावी लागलीच कधी शिक्षा, तरी कारागृहात त्यांना पंचतारांकित व्यवस्था उपलब्ध करून देण्याची? मग कुठल्या नियमांतर्गत या सार्‍या सुविधा मिळताहेत लालू आणि सुब्रतो यांना?
 
मीडियातली तमाम हुशार मंडळी ज्या तर्‍हेने लालूंच्या तेथील वर्तनाचा, दिवसभरातील त्यांच्या आचरणाचा, त्यांच्या वागण्या-बोलण्याचा, दिनक्रमाचा वृत्तान्त हिरिरीने, प्राधान्याने भारतीय जनतेसाठी उपलब्ध करून देत आहेत, लोकही ज्या चवीने त्याचे रसग्रहण करीत आहेत, ते बघितल्यानंतर ही शिक्षा भोगणे कमी आणि उपभोगणे अधिक चालले असल्याचे स्पष्टपणे जाणवते. शिक्षा देणार्‍यापासून तर ती भोगणार्‍यापर्यंत अन् कायदा तयार करणार्‍यांपासून तर तो अंमलात आणणार्‍या यंत्रणेपर्यंत सारे मिळून कायद्याचा फुटबॉल करून तो इकडून तिकडे टोलवताना दिसताहेत. अन्यथा लोकांच्या नावाचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा कागदोपत्री धिंगाणा घालणार्‍या सुब्रतो रॉय यांना किंवा कोट्यवधी रुपयांचा चारा, संगनमत करून घशात घालणार्‍या लालूप्रसाद यादवांना ही असली, वर्ल्डकप जिंकून आल्यासारखी व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट का दिली जावी? तीही कारागृहात? ही शिक्षा आहे की गंमत, की तमाशा?
 
खरंतर खंत आणि लाज वाटली पाहिजे इथल्या एकूणच व्यवस्थेला. आजपासून तीन दशकांपूर्वी उघडकीस आलेल्या एका घोटाळ्याच्या प्रकरणाच्या चौकशीत, न्यायालयीन प्रकियेत तब्बल ३२ वर्षे घालविली जातात. त्यानंतर घोषित झालीच शिक्षा तर अशा पद्धतीने त्याची थट्टा उडवणे चालले आहे? इथे खाकी वर्दीतला माणूस समोर दिसला तरी दमछाक होते. कपाळावर घामाचे थेंब उमटतात सामान्य माणसाच्या अन् लालूंसारखा राजकारणी सरकारी तिजोरी लुटूनही बेशरमपणे हसत हसत घालवू शकतो कारागृहातले दिवस? घरात मिळत नसतील एवढ्या, एखाद्या पंचतारांकित हॉटेलात असतील तेवढ्या सुविधा गजाआड असतानाही उपलब्ध होऊ शकतात त्यांना?
 
बेशरम नेता, षंढ अधिकारी यांनी मिळून हतबल जनतेपुढे मांडलेला हा तमाशा आहे. अन्यथा नावाला शिक्षा अन् प्रत्यक्षातली ही चैन अन्य कुणाला उपलब्ध आहे सांगा? न्यायालयाला दिसत नाही, त्या व्यवस्थेने ठोठावलेल्या शिक्षेचे संबंधितांनी कसे खोबरे करून ठेवले आहे ते?
 
इथून पुढे एकच व्हावे. व्यक्ती बडी असेल, राजकारणात तिचे वजन असेल, उद्योगातून तिने भरपूर श्रीमंती कमावली असेल, कुणी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली असेल, तर त्यांच्यासाठी शिक्षा ही अशीच असेल, हे न्यायालयानेच एकदा जाहीर करून टाकावे. राहिला प्रश्न कठोर शिक्षेचा, तर ती भोगायला गोरगरीब काय कमी आहेत या देशात? त्यांच्या बाबतीत कुठलाच मुलाहिजा बाळगायचा नसतो, हे तर प्रत्येकाला कळते इथे... हो ना?
एक कवी म्हणतो ते खरंच आहे-
‘यह अजीब मुल्क है
निर्बलोपर हर शुल्क है
अगर आप हो बाहुबली
हर सुविधा नि:शुल्क है...’
केलेल्या भ्रष्टाचाराची शिक्षा भोगण्याची लालूंची ही अलिशान तर्‍हा हा त्याचाच प्रत्यय आहे...
 
 
- सुनील कुहीकर 
@@AUTHORINFO_V1@@