काँग्रेसमध्ये राहुलयुगाचा प्रारंभ...

    29-Nov-2017
Total Views |


१९२९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे आपल्या वडिलांकडून म्हणजे मोतीलाल नेहरू यांच्याकडून स्वीकारली होती. त्यानंतर जवळपास ८८ वर्षांनंतर काँग्रेसमध्ये राहुल गांधी आपल्या आईकडून म्हणजे सोनिया गांधी यांच्याकडून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. यामुळे काँग्रेसमध्ये सोनियायुगाचा अस्त होऊन राहुलयुगाचा प्रारंभ होणार आहे.


आतापर्यंत राहुल गांधी उपाध्यक्ष असले, तरी पक्षाची संपूर्ण धुरा त्यांच्याकडेच होती. म्हणजे आतपर्यंत ते पक्षाचे अघोषित अध्यक्ष होते, आता ते घोषित अध्यक्ष होणार आहेत. राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष करण्यासाठी योग्य मुहूर्ताची वाट पाहिली जात होती, तो मुहूर्त गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे मिळाला आहे. मात्र, हा मुहूर्त राहुल गांधी यांच्यासाठी वाटतो तितका चांगला नाही. अध्यक्षपदी विराजमान झाल्याबरोबर राहुल गांधी यांना गुजरात आणि हिमाचलप्रदेशमधील पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे ‘प्रथमग्रासे मक्षिकापातः’सारखी राहुल गांधी यांची स्थिती होणार आहे.


राहुल गांधींच्या नेतृत्वाचा सगळ्यात मोठा दोष म्हणजे ते पक्षाला आतापर्यंत एकही मोठा विजय मिळवून देऊ शकले नाही आणि येत्या काळात पक्षाला असा विजय मिळवून देण्याची शक्यता आणि त्यांची क्षमताही नाही. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्षपद मिळाल्यामुळे राहुल गांधी यांची तुलना आता पदोपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाला एकामागून एक विजय मिळवून दिल्यामुळे त्यांची, देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेता, अशी प्रतिमा तयार झाली. राहुल गांधी जोपर्यंत पक्षाला असा एखादा मोठा विजय मिळवून देऊ शकत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या नेतृत्वाला राजमान्यता मिळू शकणार नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. आतातर आपली जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही. आतापर्यंत सोनिया गांधींच्या अध्यक्षपदाच्या पदराआड त्यांना लपता येत होते, आता मात्र ती संधी त्यांना राहिली नाही.


काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधी यांना सहजसहजी मिळाले असले, तरी ते सांभाळणे राहुल गांधी यांना वाटते तितके सोपे नाही. राहुल गांधी यांना अध्यक्ष म्हणून यशस्वी होण्यासाठी आपले नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व सिद्ध करावे लागणार आहे. विशेष म्हणजे या तिन्ही गोष्टींचा त्यांच्यात अभाव आहे. ब्रिटिश अधिकारी सर अ‍ॅलन ह्युुम यांनी १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना केली होती. त्या वेळी ह्युुम यांना स्वप्नातही असे कधी वाटले नसेल की, काँग्रेस नेहरू-गांधी घराण्याची बटिक होईल!


स्वातंत्र्याचे आंदोलन देशात काँग्रेसच्या नेतृत्वात लढले गेले. त्या वेळी काँग्रेस कुणा एका व्यक्तीची वा घराण्याची झाली नव्हती. काँग्रेसची स्थापना काही मोतीलाल नेहरू वा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली नव्हती, मात्र तरीसुद्धा काँग्रेस नेहरू आणि गांधी घराण्याच्या दावणीला कधी बांधली गेली, ते कुणाला कळलेच नाही! काँग्रेसचा खर्‍या अर्थाने र्‍हास येथूनच सुरू झाला. आज काँग्रेसची जी दयनीय स्थिती दिसते, त्याचे मूळ पक्षाच्या या घराणेशाहीत दडले आहे. मात्र, त्यापासून कोणताही बोध घेण्याची काँग्रेसची तयारी नाही.


नेहरू-गांधी घराण्याच्या बाहेरचा कुणी काँग्रेसचा अध्यक्ष झाल्याचे काँग्रेसमध्ये खपवून घेतले जात नाही. मधल्या काळात सीताराम केसरी आणि पी. व्ही. नरसिंह राव काही काळासाठी काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते, पण नंतर त्यांचे काय हाल काँग्रेसच्या नेत्यांनी केले, तो इतिहास ताजा आहे.


निवडणूक आयोगाने ३१ डिसेंबरपर्यंत संघटनात्मक निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश काँग्रेस पक्षाला दिले आहेत, त्यामुळे काँग्रेस कार्यसमितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. काँग्रेसमध्ये ही फक्त दाखवायची लोकशाही आहे, अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला, तरी अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची कोणतीच शक्यता नाही. परीक्षेच्या आधीच निकाल लागावा, त्याप्रमाणे काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार, ते जगजाहीर आहे.


राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचे पुत्र, एवढीच काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची राहुल गांधी यांची पात्रता आहे. मात्र, घराणेशाहीतून मिळालेले अध्यक्षपद टिकवण्यासाठी त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. अध्यक्षपद घराणेशाहीतून मिळाले असले, तरी त्यासाठी आपण पात्र होतो, हे राहुल गांधी यांना आता सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी बालिशपणा सोडून जबाबदारीने वागावे लागणार आहे, प्रगल्भता दाखवावी लागणार आहे. स्वत:ची ‘पप्पू’ म्हणून तयार झालेली प्रतिमा मोडून काढावी लागणार आहे.


राहुल गांधी यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान पक्ष एकजूट ठेवण्याचे आहे. पक्षसंघटना चालवताना सर्वांना सोबत घेऊन चालावे लागते, आपली मनमानी करता येत नाही. फक्त तरुणांच्या बळावरच आपण राजकारण करू, काँग्रेस चालवू, हा त्यांचा समज त्यांच्या प्रगतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरणार आहे. राजकारण करताना ज्याप्रमाणे नव्या दमाचे तरुण लागत असतात, त्याचप्रमाणे जुन्या अनुभवी नेत्यांचीही गरज पडत असते. त्यामुळे ‘तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क’ यांची योग्य ती सांगड राहुल गांधी यांना घालता आली, तर त्यांची अध्यक्षपदाची कारकीर्द यशस्वी होऊ शकते. अशी सांगड घालता आल्यामुळेच सोनिया गांधी यांनी विक्रमी म्हणजे १९ वर्षे पक्षाचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांना जे जमले नाही, ते सोनिया गांधी यांंनी करून दाखवले. इंदिरा गांधींनी ८ वर्षे, राजीव गांधींनी ७ वर्षे तर जवाहरलाल नेहरू यांनी ६ वर्षे काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले. मोतीलाल नेहरू फक्त दोन वर्षच काँग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र, या सगळ्यांचा विक्रम सोनियांनी मोडला. पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले, तेवढे मात्र सोनियांना शक्य झाले नाही.


आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पक्षाला दोनदा सत्तेवर आणण्यात सोनिया गांधी यशस्वी झाल्या. पक्षातील जुन्या नेत्यांनी अध्यक्ष झाल्यावर त्यांना त्रास दिलाच नाही, असे नाही. पण, काही नेत्यांच्या त्रासासाठी त्यांनी पक्षातील सगळ्याच ज्येष्ठ नेत्यांना शिक्षा दिली नाही. राहुल गांधी नेमकी तीच चूक करत आहेत. त्यांनी पक्षातील सगळ्याच ज्येष्ठ नेत्यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. यातून नुकसान काँग्रेस पक्षाचे आणि राहुल गांधी यांचे स्वत:चे होणार आहे.


पक्ष चालवताना फक्त जोशच नाही, तर होशही आवश्यक असतो. मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी, हा जसा सार्वत्रिक प्रश्न आहे, त्याचप्रमाणे राहुल गांधी यांना समजवावे कुणी, असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांना पडला आहे. राहुल गांधी अध्यक्ष झाल्यामुळे काँग्रेसला गळती लागली, पक्षाचे ज्येष्ठ नेते वेगवेगळ्या कारणाने पक्षातून बाहेर पडायला सुरुवात झाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.


सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकारण हा फुलटाईम जॉब आहे, पार्टटाईम नाही, याची जाणीव राहुल गांधी यांनी ठेवायला पाहिजे. आतापर्यंत उपाध्यक्ष असताना कधीही मनात आले आणि परदेशात निघून गेले, असे त्यांना आता करता येणार नाही. पक्षसंघटना वार्‍यावर सोडून वारंवार विदेशात पळता येणार नाही, कोणतेही कारण नसताना अज्ञातवासात जाता येणार नाही. राजकारणी माणसाने सुटी घेऊच नये असे नाही, पण त्याने योग्यवेळी आणि योग्य कारणासाठी सुटी घ्यायला पाहिजे. राहुल गांधी नेमके चुकीच्या वेळी सुटी घ्यायचे. ज्या वेळी पक्षाला राहुल गांधी यांची आवश्यकता असायची त्या वेळी हे महाशय कुठेतरी बेपत्ता झालेले असायचे! त्यामुळे राहुल गांधी यांना सर्वप्रथम स्वत:ला बदलावे लागणार आहे. राहुल गांधी यांनी स्वत:मध्ये बदल केले तर अध्यक्ष म्हणून ते यशस्वी होऊ शकतील. मात्र, त्यांनी बदल केले नाही, तर त्यांचे स्वत:चे आणि काँग्रेसचेही भवितव्य कठीण आहे. काँग्रेसमुक्त भारताचे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न साकारायला वेळ लागणार नाही!

- श्यामकांत जहागीरदार
9881717817

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.