कोरियाच्या दृष्टीने अयोध्येचे महत्त्व

    29-Nov-2017
Total Views |



इसवी सन 48 साली, अयोध्येची राजकन्या राणी सुरीरत्ना, कोरियातील एका राज्याच्या राजाशी विवाह करण्यासाठी कोरियाला गेली होती. 2015 सालच्या मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरियाच्या सेऊलला भेट दिली तेव्हा घोषणा केली की, कोरिया आणि अयोध्या यांच्यातील हा जो ऐतिहासिक स्नेहबंध आहे तो अधिक बळकट करण्यात येईल. कोरियामध्ये हुर वाँग ओक या नावाने ओळखण्यात येणार्‍या राणी सुरीरत्ना यांच्या तेथील स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात येईल, तसेच अयोध्येतही उभारण्यात येणारे स्मारक दोन्ही देशांची संयुक्त योजना असेल. या घोषणेचा पाठपुरावा म्हणून, आयसीसीआरतर्फे (इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रीलेशन्स) 2015 साली दोन दिवसांची एक परिषद आयोजित करण्यात आली होती. यात भारत तसेच कोरियातील विद्वानांनी भाग घेतला होता.

असे असले तरी या परिषदेची किंवा दोन हजार वर्षांपूर्वीच्या महान सांस्कृतिक आदानप्रदानाच्या इतिहासाची कुठेही चर्चा झाली नाही की कुणी दखलही घेतली नाही. यात कुठले राजकारण नसल्यामुळे असेल कदाचित, मीडियाला त्यात काही रस नसावा. अगदी स्पष्टच सांगायचे झाल्यास, भारतातील या ऐतिहासिक महत्त्वाच्या संबंधाबाबत कुणालाच उत्सुकता नाही. कोरियाचे प्रसिद्ध विद्वान प्रा. किम ब्युंग मो यांचे कोरियन भाषेत या ऐतिहासिक संबंधावर विस्तृत पुस्तक आहे, तसेच कोरियन भाषेत एक वृत्तपट आहे, जो तिथल्या दूरदर्शनवर दाखविला जातो. परंतु, इकडे भारतात मात्र अक्षरश: या संबंधाबाबत काहीच साहित्यकृती नाही. अयोध्येच्या राणीने त्या विशिष्ट काळात कोरियापर्यंत कसा प्रवास केला आणि तिथल्या राजाशी विवाह का केला, हे स्नेहबंध कसे प्रस्थापित झाले, हा शाही विवाह कसा संपन्न झाला आणि या दोन देशांत किंवा समाजांत संबंध कसे विकसित होत गेले, यासंबंधी अभ्यास करण्याची आणि त्यावर विस्तृत प्रकाश टाकण्याची एकाही भारतीय विद्वानाला आजपर्यंत कधीच गरज भासली नाही. स्पष्टच सांगायचे, तर कोरिया हा काही आपला शेजारी देश नाही. अयोध्येहून कोरियाला जायचे म्हटले तर ते सागरी मार्गानेच शक्य होते आणि त्यासाठी खडतर प्रदेश तसेच उफाणता समुद्र ओलांडून जाण्यासाठी कमीतकमी 3 ते 4 महिने लागले असतील. त्यांची काय गडबड उडाली असेल? इतक्या दूर राणीने का प्रवास केला असेल? यावरही काही संशोधन करावे, असे कुणालाही आजतागायत वाटले नाही. पण, कोरियात हा वारसा अजूनही कायम आहे आणि म्हणूनच ही घटना कोरियन लोकांच्या दृष्टीने आजही फार महत्त्वाची आहे.

या विवाहापासून कोरियात राणी सुरीरत्ना यांचा संबंध दर्शविणारे दोन वंश आजही प्रचलित आहेत. पहिला इंचोन भागातील ‘ली’ वंश. या वंशाने कोरियाला महान नेते व विद्वान दिलेत. दुसरे ‘गिम्ही’ व ‘हुस.’ हे वंश भारतातील गोत्र परंपरेप‘माणे आंतरवंश विवाह करीत नाहीत. ही सांस्कृतिक वंशावळ इतकी मजबूत आहे की, प्राचीन काळापासून भारताप्रमाणेच जगाच्या या भागातही सगोत्र विवाह निषिद्ध मानला आहे व ती आजही कायम आहे.

द्वीपकल्प असलेला कोरिया देश, राणी सुरीरत्ना यांचे वंशज जनरल किम यू-शिन यांनी सातव्या शतकात प्रथमच एकत्र बांधला. या वंशाने अलीकडच्या काळात जे महान लोक दिलेत त्यात, कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिकप्राप्त किम दाई-जंग, माजी राष्ट्राध्यक्ष किम यंग-साम, माजी पंतप्रधान किम जोंग-पिल आणि माजी राष्ट्राध्यक्ष ली म्यांग-बाक यांची पत्नी किम यून-ओक यांचा समावेश आहे.

महाराणी सुरीरत्ना नसती तर आजचा कोरिया निर्माणच झाला नसता, अशी स्थिती आहे. इतिहास सांगतो की, राणी सुरीरत्ना रिकाम्या हाताने प्रवासाला निघाली नव्हती. ती जेव्हा जहाजाने किर्न्ही येथे पोचली तेव्हा तिच्याजवळ तीन मूल्यवान गोष्टी होत्या. मूर्ती, सूत्रे आणि श्रमण (साधू). तिनेच देशाची पहिली राजधानी स्थापन केली आणि तिला गया हे नाव दिले. जनजातींमध्येच असलेला हा देश प्रथमच एक राज्य म्हणून उदयाला आला. या राणीला सुरक्षितपणे कोरियापर्यंत येऊ दिले म्हणून समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राजाने सागरी कृपेचे मंदिर- हेइन्सा बांधले. ते आजही पुनसाँगसान पहाडावर स्थित आहे.

भारतीय गुरू मल्लानंद यांनी इ. स. 384 मध्ये पेक्चे येथे बुद्ध धर्माचा प्रसार केला. कोरियन साधू हेचो यांनी वयाच्या सोळाव्या वर्षीच भारतीय गुरू वज‘बोधी यांचे शिष्यत्व पत्करले. नंतर ते सामुद्री मार्गाने भारतात आले व मध्य आशियाच्या मार्गाने डिसेंबर 727 मध्ये कोरियात परतले. समरकांडमध्ये त्यांनी भिक्खू असलेल्या एका मठाची नोंद केली आहे. सिल्क रूटने प्रवास करणारे हेचू हे शेवटचे प्रवासी ठरले. कारण त्यानंतर इस्लामच्या टोळधाडीने सर्व मठ आणि भिक्खू नष्ट झाले होते. हा विध्वंसाचा काळ त्यांनी आपल्या प्रवासवर्णनात नोंदविला आहे. हे वर्णन प्रसिद्ध प्रवासी हुआन-त्सांग यांच्या प्रवासवर्णनाइतकेच महत्त्वाचे आणि खात्रीलायक मानले जाते.

मंगोल आक‘मणापासून सुरक्षित राहावे म्हणून, कोरियाच्या राजाने कोरियन भाषेतील बौद्धांचा धर्मग‘ंथ- त्रिपिटक कोरियाना, 81 हजार 258 लाकडी ठोकळ्यांवर कोरून घेतला. हे कार्य 1251 साली पूर्ण झाले. हे लाकडी ठोकळे आजही माऊंट गया वरील हेइन्सा मठात अतिशय सुस्थितीत ठेवण्यात आले आहेत. राष्ट्रीय एकतेचे ते प्रतीक बनले आहेत. देशाच्या संरक्षणासाठी लाकडात कोरून ठेवलेले हे त्रिपिटक, सात शतकांपूर्वीच्या कोरियाच्या तंत्रज्ञानाचा चमत्कारच समजला जातो.

कोरियाला भेट देणारे शेवटचे भारतीय आचार्य म्हणजे धन्यभद्र. ते 1340 साली कोरियाला गेले आणि नालंदा विद्यापीठाच्या धर्तीवर तिथे त्यांनी ज्युनिपर शिलामठ स्थापन केला. याचे अवशेष सेऊलनजीक आजही आहेत. मंगोल आक्रमकांच्या प्रभावापासून कोरियन समाज मुक्त व्हावा तसेच तिथे शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून, धन्यभद्र यांनी अतिप्रचंड योन्बोस्का घंटेवर संस्कृत धारणी मंत्र लिहून काढले आहेत.

1446 साली, साधुतुल्य सम्राट सेइजोंग यांनी नवी कोरियन मुळाक्षरे तसेच अक्षरांचे मुद्रण-खिळे शोधून काढले. आजदेखील ही लिपी ‘हंगुल’ म्हणजे अधिकृत लिखाणासाठी वापरली जाते. डॉ. केइ वोन चुंग यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातील संशोधन लेखात म्हटले आहे- कोरियन मुळाक्षरे संस्कृत मुळाक्षरांच्या सिद्धांतांवर तयार करण्यात आले आहेत. या नव्या मुळाक्षरांमुळे समाजातील फार मोठ्या वर्गाला शिक्षण सुलभ झाले.

हंगुल लिपीच्या शोधापूर्वी कोरियन चिनी लिपीत लिहीत असत. हंगुल लिपी सम्राट सेइजोंग यांच्या आदेशाने तयार करण्यात आली. त्यांच्या कारकीर्दीत पुन्हा एकदा बौद्ध धर्म राजप्रासादात प्रवेशला. मंदिरांचे निर्माण झाले. महाधर्मकोश प्रकाशित करण्यात आला. मोठ्या संख्येने ग्रंथ हंगुल लिपीत छापण्यात आले. ही लिपी संस्कृतच्या ध्वनी उच्चारांवर आधारलेली आहे.

पुरुषोत्तम रामाची जन्मभूमी अयोध्येने, भारतीय ज्ञानाच्या प्रसारासाठी योगदान दिले आहे. त्यामुळे भारताचा संदेश सार्‍या जगात पुन्हा प्रसारित करण्यासाठी अयोध्या शहराचे पुनरुत्थान होणे फार महत्त्वाचे आहे. केवळ कोरियनच नाही, तर बर्‍याच संस्कृतींच्या हितासाठी अयोध्येचा पुन्हा उदय होईल का, हा प्रश्न आहे. वारशाने लाभलेल्या या सांस्कृतिक संबंधरूपी संपत्तीकडे आतातरी भारत दुर्लक्ष करू शकणार नाही, असे वाटते.

 

श्याम परांडे

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.