मुलींचा जन्म नाकारणारी हीन मानसिकता...

    29-Nov-2017
Total Views |


 

लडकियोंपे क्या गुजरी

कुछ बता नही पाती

जखम उम्रभर का है

और बेजबानी है...

दिल्लीतील ते ‘जगप्रसिद्ध’ बलात्कार प्रकरण मुकाट्यानं सहन करून शेवटी स्वत:चा जीव गमावूनही ‘अनामिकच’ राहिलेल्या त्या तरुणीबाबत एका कवयित्रीच्या भावना शब्दातून अशा व्यक्त झाल्या, तर कुटुंबातील सर्वांनाच वंशाचा दिवा हवा असताना, कुणालाच नको असलेलं स्वत:चं अस्तित्व सिद्ध करायला जगात आलेली चिमुरडी एका वृद्धेनं निर्दयतेनं चिरडून टाकल्याची घटना तर अगदी परवाची आहे...

खरंच प्रगत झालोय् आम्ही? की, आधुनिकतेची कास धरणे हा नुसता तोंडदेखलेपणा असतो अन् बुरसटलेल्या विचारांचंच गाठोडं उशाशी बाळगत जगतात लोक इथले? पोरगंच जन्माला घालण्याच्या खुळ्या हट्टापायी, घरात पाऊल ठेवलेल्या तिसर्‍या मुलीचा गळा घोटून अवघ्या सत्तावीस दिवसात तिची इहलोकीची यात्रा संपविण्याच्या कृत्याचं समर्थन अन्यथा कसं आणि का करायचं? एकवीसाव्या शतकातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही मुलाचाच आग‘ह धरणारी मानसिकता, नेमकी कुठे नेणार आहे या समाजाला? घरात दोन मुलींचा जन्म झाल्यानंतरही ‘मुलगा हवाच’चा दुराग‘ह कायम राहिला अन् तरीही मुलगीच जन्माला आली तर मागासलेल्या विचारांच्या आजीनं संपवून टाकलं तिला एकदाचं. गुदमरून संपलेला जीव कापसाच्या ढिगाखाली सरकवून ती स्वत: मोकळा श्वास तरी कशी घेऊ शकली असेल? या प्रकरणात त्या आजीला अटक झाली आहे.  आता पुढची कायदेशीर प्रकि‘या पार पाडली जाईल. पोलिस ठाण्यापासून तर कोर्टापर्यंतच्या फेर्‍याही झडतील. कदाचित म्हातारीला कठोरातली कठोर शिक्षाही होईल. पण...पण इथे मुद्दा असा आहे की, आपल्या स्वयंघोषित पुढारलेल्या समाजाची मानसिकता केव्हा बदलेल?

सेक्स टुरीझम साठी प्रसिद्ध असलेल्या पटायासार‘या प्रदेशात मुलगी जन्माला आलेल्या घरात साजरा होणारा आनंदोत्सव वर्णनातीत असतो म्हणतात. दुर्दैव फक्त एवढंच असतं की, त्या आनंदामागे स्त्री-पुरूष भेद संपविण्याच्या दिशेनं पाऊल टाकण्यासाठीच्या प्रयत्नांचा अंशही नसतो. उलट, वयात येताच तिला बाजारात बसवून, तिच्या माध्यमातून घरासाठी पैसा कमाविण्याच्या योजनेचे गुपित त्यामागे दडलेले असते. मुलगी जन्माला आली की लागलीच नाकं मुरडणार्‍या मातीमोल भारतीय मानसिकतेच्या तुलनेत हा आनंदोत्सव काही फार उंचीवर नेऊन ठेवण्याच्या लायकीचा असतो, अशातला भाग नाही. उलट, उपभोगाच्या पलीकडे स्त्रीयांची उपयोगिता शून्य ठरविण्याच्या निम्नस्तरीय विचारशैलीचा तो परिपाक असतो. भारतीय समाजही विचारांची तीच नीच पातळी गाठण्यासाठी धडपडतोय् की काय, असे वाटू लागले आहे अलीकडे.

 

एकीकडे भेदरहीत समाज रचनेची कल्पना मांडायची. त्यासाठीचा कमालीचा आग‘ह धरायचा. पुरूषांच्या तुलनेत स्त्रीयांनी रचलेल्या इतिहासाचे, त्यांनी स्वकर्तृत्वातून निर्माण केलेल्या नवनवीन परिमाणांचे कवित्व गायचे. खांद्याला खांदा लावून चालण्याच्या त्यांच्या कर्तबगारीचे कौतुक करायचे, चूल आणि मूल संकल्पनेपलीकडच्या कल्पना रंगवून मांडायच्या. पण प्रत्यक्षात त्यानुसार वागण्याची वेळ आली की, तेव्हा मात्र सरड्यासारखा रंग बदलत आपल्या कूपमंडूक वृत्तीचे प्रदर्शन निलाजरेपणाने घडवायचे. असे असतानाही तरीही सामाजिक धारणा बदलत चाललल्या असल्याची ग्वाही देत, मिरवणार आम्ही? जराशी लाज वाटत नाही इथे कुणालाच, कालपर्यंतच्या विविध समस्यांचे सामाजिक आशय आता बदलत चालले असल्याचा दावा करताना? 

पुरोगामी म्हणावणार्‍या महाराष्ट्राच्या सुदूर टोकावर आडवळणावरील सोमलगुडा नावाच्या एका छोट्याशा गावातील ही घटना दुर्दैवी तर आहेच. पण ती तेवढीच अनाकलनीयही आहे. समाजाच्या आकलनाच्या मर्यादीत कक्षा हळूहळू रुंदावत चालल्या असल्याचे, मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोनही एव्हाना बदलत चालला असल्याचेही कुणी ठामपणे सांगू शकणार नाही. खरंच, कशासाठी घोटला असेल त्या थेरडीनं 27 दिवसांच्या अर्भकाचा गळा? बरं तशीही ती नात होती तिची.  तिच्या आईवडीलांनी जर तीचा स्वीकार केला होता, तर मग आजीचं काय घोडं मारलं गेलं होतं, नातीचा जीव घ्यायला? खरं तर या घटनेनं अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. वैयक्तिक विचारांच्या स्तराबाबत, सामाजिक प्रघातांच्या निकषांबाबत, प्रगतीच्या आमच्या टुकार दाव्यांबाबत, जुन्या-टाकावू रुढी, परंपरांवर आसूड ओढतानाही त्या पदराचा एक टोक धरून ठेवण्यासाठी चाललेल्या आमच्या लज्जास्पद, अर्थविहीन धडपडीबाबत, ‘यत्र नार्यस्तु पुज्यंते’ चा मंत्र जपताना ज्यांची जीभ जराही अडखळत नाही, त्यांनीच चालविलेल्या स्त्री-सुलभ भावनेच्या थट्टेबाबत...

एकीकडे महिलांना लक्ष्मी-दुर्गा-महाकालीच्या स्थानी विराजमान करण्यासाठी सरसावणारी समाजातली हीच माणसं वेळ आली की याच अवतारांच्या इभ‘तीची लक्तरे वेशीवर टांगतात, तेव्हा जीवाचा जो संताप होतो ना, अगदी तीच स्वाभाविक भावना परवा सोमलगुडाच्या त्या घटनेनं सर्वदूर झाली आहे. अर्थात, इवलासा, नाजुकसा तो जीव निर्दयीपणे असा एका क्षणात संपवून टाकण्याची ही घटना काही अशी अचानक थोडीच घडली असणार? कुठल्याशा एका क्षणी तोल जाऊन त्या म्हातारीनं ते बाळ चिरडून टाकले असण्याचीही शक्यता कमीच. मुळात

 

घरात आधीच दोन मुली असतानाही या यंदा कुटुंबाला मुलगाच हवा होता. पण तिसर्‍याहीवेळी मुलगी झाल्याचा राग हा अशा पद्धतीनं व्यक्त झाला. हवा असतानाही वंशाचा दिवा मिळाला नसल्याचा त्रागा या तर्‍हेने व्यक्त झाला. तो त्रागा, तो राग, वर्षानुवर्षे मानगुटीवर बसलेल्या परंपरागत विचारांच्या पगड्यातून तयार झाला असल्याचे धगधगते वास्तव नाकारता कसे येईल कुणाला? सोमलगुडाच कशाला, हा परिणाम तर बड्या शहरांमधूनही दिसतोच आहे सगळीकडे. भारतातील पाचशेपेक्षा अधिक मोठ्या नगरांमधील दरहजारी पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण केवळ 902 एवढे आहे. ग‘ामीण भागाच्या तुलनेत या देशातील तमाम बड्या शहरांमधील घसरलेला मुलींचा जन्मदर, हा कशाचा परिणाम समजायचा एरवी? वर म्हटल्याप्रमाणे हाँगकाँग, पटायामध्ये होणारे मुलींच्या जन्माचे स्वागतही, तेथील समाजाच्या हीन अभिरुचीची, विचारांच्या नीच दर्जाचीच फलश्रृती आहे. त्यामुळे केवळ दुर्गम, ग‘ामीण भागातील माणसंच मागासलेली असल्याचा समज करून घेण्याचे कारण नाही. वर्तणुकीतून सिद्ध होणारे विचारांचे मागासलेपण तर दिल्ली, मुंबई, हाँगकाँग, पटायामध्येही आहे. पुढारलेपण मिरविणार्‍या या समाजाला मुलींचा जन्म नेमका का नको असतो, याचाही विचार झालाच पाहिजे कधीतरी. कधीतरी आम्हीही समजून घेत हे म्हटलं पाहिजे की,

अंजुम तुम अपने शहरके लडकोसे ये कहो

पैरो की बेडीया नाही, पायल है लडकीया

 

 

राणीच्या पोटी मुलगी जन्माला आली की, या कानाची खबर त्या कानाला लागणार नाही अशा बेताने, झाकलेल्या माठात तो जीव ठेवून सूर्योदयापूर्वी दूर कुठे तरी नेऊन पुरण्याची कधीतरी ऐकलेली कहाणी धादांत खोटी असावी असं सारखं वाटत राहायचं परवा परवापर्यंत. माणसं एवढी थोडीच निष्ठूर असू शकणार आहे, हा ओघानं डोकावणारा प्रश्न, तो समज खोटा ठरविण्यासाठी धडपडायचा. पण, परवा सोमलगुड्यातील ती घटना कानावर पडली अन् मातीत पुरल्या जाणार्‍या झाकलेल्या माठातील जीवंत मुलीची कहाणी खोटी ठरविण्याचे कारणच गवसेनासे झाले...

 

सुनील कुहीकर

9881717833

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.