ओळख बांगलादेशाची

    16-Nov-2017   
Total Views |

 

MAP Courtesy: Hindus in South Asia & The Diaspora- A Survey of Human Rights, 2017- Hindu American Foundation

 

बांगलादेशाची स्थापना

सन १९७१ ला भारत - पाकिस्तान युद्धात भारताचा विजय झाला व पाकिस्तानची फाळणी होऊन 'बांगलादेश'ची निर्मिती झाली. सन १९७१ च्या आधी बांगलादेश 'पूर्व पाकिस्तान' म्हणून ओळखला जात होता. आजच्या भारतातील पश्चिम बंगाल व बांगलादेश हा संपूर्ण भूभाग सन १९४७ च्या आधी ब्रिटिशकालीन भारतात 'बंगाल प्रांत' म्हणून ओळखला जात होता. १९४७ ला भारत- पाकिस्तान फाळणीच्यावेळी बंगाल प्रांताची पश्चिम बंगाल व पूर्व पाकिस्तान अशी फ़ाळणी झाली होती.

 

बांगलादेश- भौगोलिक स्थान

भारताची सर्वाधिक सीमारेषा बांगलादेशाच्या लगत आहे. भारत-बांगलादेश सीमारेषा ४०९६ किमी लांबीची आहे. बांगलादेशाच्या पश्चिमेला बिहार व प.बंगाल (२२१६.७ किमी), उत्तरेला मेघालय (४४३ किमी), ईशान्येला आसाम (२६३ किमी), पूर्वेला त्रिपुरा (८५६ किमी) व मिझोराम (३१८ किमी) ही भारताची राज्ये आहेत; तर आग्नेयला म्यानमार व दक्षिणेला बंगालचा उपसागर आहे. फ़ाळणीच्यावेळी अखंड बंगालचा ६६% भूभाग पूर्व पाकिस्तानला व ३४% भूभाग भारताला मिळाला.

 

लोकसंख्या

बांगलादेशची एकूण लोकसंख्या १५ कोटी ६१ लक्ष ८६ सहस्र ८८२ (२०१६ पर्यंतच्या अनुमानानुसार) आहे. त्यांपैकी मुस्लिम ८९.१% (मुस्लिमांमध्ये सुन्नी बहुसंख्य आहेत, अंदाजे ९०%), हिंदू १०% (पण वर्तमान अनुमानानुसार ८%) तर बौध्द व ख्रिश्चनांसह ०.९%. (२०१३ पर्यंतच्या अनुमानानुसार). काही छोट्या व्दीपांचा व शहर राज्यांचा अपवाद वगळता बांगलादेश हा जगातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला देश आहे. चिमुकल्या बांगलादेशची लोकसंख्या महाकाय रशियाच्या लोकसंख्येएव्हढी आहे.

 

 

राज्यघटनेतील बदल

१९७१ ला बांगलादेशच्या नवनिर्मित राज्यघटनेत ’समाजवाद व संप्रदायनिरपेक्षता’ हे शब्द होते पण शेख मुजीब उर्-रहमान यांच्या हत्येनंतर सत्तास्थानी आलेल्या जन. झिया उर्-रहमान यांनी त्याऐवजी ’सामाजिक न्याय’ व ’सर्वशक्तिमान अल्लाहवर निरपवाद श्रध्दा’ हे शब्द टाकले. ’बिस्मिल्ला इर्रहमान ईरहीम’ (’द्याळू अल्लाहच्या नावाने’) हा कुराणातील शब्दसमुच्चयही घटनेच्या प्रारंभी घालण्य़ात आला. १९८२ ला लोकशाही शासनाला उलथवून सत्तेवर आलेल्या जन. हुसेन मुहम्मद इर्शाद यांनी ८वी घटनादुरूस्ती करून सन १९८८ ला इस्लामला राजधर्माचा दर्जा दिला. विद्यमान पंतप्रधान शेख हसिना यांना सन २०११ ला ही ८ वी घटनादुरूस्ती रद्द करायची सुवर्णसंधी आली होती पण त्यांनी ते टाळले. इस्लामचा राजधर्माचा दर्जा काढून टाका असा २८ वर्षापूर्वीचा अर्ज मार्च २०१६ ला न्यायालयापुढे आला व २ मिनिटात न्यायालयाने तो फेटाळून लावला.

 

संदर्भ

१. गोडबोले, डॉ. श्रीरंग; बौध्द-मुस्लिम संबंध- आजच्या संदर्भात, तक्षशिला प्रबोधिनी प्रकाशन, २००९, पृष्ठ ६२,

२. Hindus in South Asia & The Diaspora- A Survey of Human Rights, 2017 by Hindu American Foundation

३. गोडबोले, पृष्ठ ६२,

४. उपरोक्त, पृष्ठ ६४

५. Sattar, Maher & Barry, Ellen; In Two Minutes, Bangladesh Rejects 28-Yr-Old Challenge to Islam’s Role, 28 March 2016, New York Times

 

- अक्षय जोग

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय जोग 

सावरकर, हिंदुत्व, राष्ट्रवाद, भारतीय स्वातंत्र्यलढा व क्रांतिकारक ह्या विषयाचे अभ्यासक. www.savarkar.org संकेतस्थळाच्या कार्यात सहभाग.

विश्व संवाद केंद्र, पुणे कार्यकारिणी सदस्य.