निर्देशांक पुन्हा 28 हजारावर

    25-Jul-2016
Total Views |

 

संसदेत याच आठवड्यात वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी विधेयक पारित होण्याची शक्यता बळावलेल्या उत्साहित झालेल्या गुंतवणूकदारांनी आज सोमवारी खरेदीवर विशेष भर दिला. यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने २९२ अंकांच्या कमाईसह २८ हजाराचा स्तर पुन्हा एकदा पार केला. राष्ट्रीय शेअर बाजारही १५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला.

शेअर बाजारात सकाळपासूनच विदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा प्रवाह सुरू झाला होता. त्यातच जीएसटी विधेयकावर मोहर उमटणे आता केवळ औपचारिकता असल्याने गुंतवणूकदार प्रचंड उत्साहित होता. सकाळची सुरुवात घसरणीने झाल्यानंतरही अवघ्या पहिल्या तासातच शेअर बाजाराची वाटचाल कमाईकडे सुरू झाली होती. दुपारपर्यंतच्या व्यवहारात ही कमाई २८४ अंकांपर्यंत पोहोचली होती. सकाळच्या सत्रात २७,७३६.५१ असा नीचांक गाठणारा निर्देशांक दिवसअखेर २८११०.३९७ या स्तरावर गेला होता. तथापि, सायंकाळी काही प्रमाणात घसरणही झाली. शेवटी २९२.१० अंकांच्या कमाईसह तो २८०९५.३४ या स्तरावर बंद झाला. गेल्या वर्षी १० ऑगस्टनंतर शेअर बाजाराने प्रथमच हा स्तर गाठला आहे.

५० कंपन्यांवर आधारित राष्ट्रीय शेअर बाजाराचे प्रतिनिधित्व करणार्‍या निफ्टीनेही ९४.४५ अंकांच्या कमाईसह १५ महिन्यांचा उच्चांक गाठला. दिवसभराच्या घडामोडीत ८६४१.१५ असा स्तर गाठल्यानंतर काही घसरणीसह निफ्टी ८६३५.६५  या स्तरावर बंद झाला. गेल्या वर्षी १६ एप्रिल रोजी निफ्टीने ८७०६.७० असा स्तर गाठला होता.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.