डॉ. खानखोजे : नाही चिरा ...

    07-Nov-2016
Total Views |

 

देशाला स्वातंत्र्य मिळून जुनं झालंय. काही ठराविक नावे वगळता स्वातंत्र्यसंग्रमातल्या प्रसिद्ध व्यक्तींचाच विसर पडलाय, मग अप्रसिद्ध/अप्रकाशित अग्रणींची आठवण राहणे कसे शक्य आहे ? त्यामुळेच पांडुरंग सदाशिव खानखोजे नावाच्या प्रखर क्रांतिकारक, एक उत्तुंग कृषितज्ञ अस्तित्वात होता हे सत्य चारचौघांशिवाय फारसे कुणाला ज्ञातच नाही. त्यांच्यासारखे अनेक क्रांतिकारक स्वातंत्र्यासाठी पराकाष्ठा करत होते त्या सर्वांचा आदर ठेवून असे म्हणावेसे वाटते की खानखोजे यांच्या इतका आवाका, संचार फार कमी लोकांचा असेल. चित्रपटातसुद्धा सापडणार नाही इतके वादळी जीवन जगलेला हा क्रांतिकारक ! या विलक्षण व्यक्तिमत्वाचा ७ नोव्हेंबर हा जन्मदिवस, त्यानिमित्ताने त्यांच्यावर वीणा गवाणकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाची आणि त्याद्वारे या महान व्यक्तिमत्वाची ही ओळख.

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म वर्ध्याचा, १८८४ सालचा. १८५७ च्या क्रांतीत सहभाग घेतलेल्या आजोबांचा घरात वारसा लाभलेला. लहान वयातच पांडुरंग खानखोजे यांनी विविध संघटनांची स्थापना केली आणि कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठका घेऊन क्रांतिकार्य अधिक व्यापक करायला सुरुवात केली. १९०३ साली लग्नाच्या आदल्या दिवशीच चक्क समर्थ रामदासांप्रमाणे पलायन केले. काही काळ हैदराबादमध्ये राहून वर्ध्यास परतले पण तोपर्यंत देशकार्याचा निर्धार अधिकच पक्का झाला होता. दुसरे लग्न करण्यासही घरच्यांना नकार दिला आणि पुन्हा घर सोडले. स्वतःची सर्कस काढली त्याद्वारे नेमबाजी आणि कसरतींचे शिक्षण, लोकजागृती असे अनोखे मार्ग चोखाळले. परंतु एका वादळात सर्कशीची अपरिमित हानी झाल्याने त्याचा नाद सोडावा लागला. मग शिफारसपत्र घेऊन पुण्यात दाखल होऊन थेट लोकमान्य टिळकांची भेट घेतली. अमेरिकेत जाऊन रणशास्त्र शिकून त्याचा वापर क्रांतीकार्यासाठी करावा असा टिळकांनी सल्ला दिल्यामुळे खानखोजे अधिकच प्रेरित झाले. अमेरिकेहून परतलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांची भेट घेतली. त्यांच्या शिफारसपत्रासह अमेरिकेत जाण्याचा बेत पक्का केला. परंतु ऐनवेळी अश्या काही घटना घडल्या की त्यांनी जपानला प्रयाण केले.

जपानमधले त्यांचे महत्वाचे काम म्हणजे विद्यार्थ्यांचे क्रांतीकारी संघटन ! चीनी क्रांतिकारक सन-यत्-सेन याचा पाठिंबा मिळवला. ‘अधरचंद्र लष्कर’ या जपानमधल्या प्रमुख सहकाऱ्याच्या मदतीने ‘इंडिअन इंडीपेंडेन्स लीग’ची स्थापना केली. जपानने त्यांना खूप काही शिकवले – श्रमप्रतिष्ठा, तंत्रज्ञान, स्वयंपूर्णता, लष्करी शिक्षण आणि यासोबतच आधुनिक कृषिशास्त्राचा अवलंब करण्याचे महत्व ! हे सर्व चालू असतानाच सानफ्रान्सिस्को येथे मोठा भूकंप झाला. पुनर्वसन कार्यासाठी मजुरांची खूप गरज भासू लागली. अमेरिकेत प्रवेश करण्याची ही नामी संधी चालून आल्याने खानखोजे यांनी आपला मोर्चा तिकडे वळवला.

अमेरिकेत पोचल्यावर स्वस्थ न बसता पुन्हा एकदा त्यांनी एकीकडे तिथल्या भारतीयांचे संघटन करायला सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूला जपानमध्ये गवसलेल्या दृष्टीचा विस्तार करण्यासाठी कॅलिफोर्निया विद्यापिठात कृषिशास्त्राच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला. भारतात राजकीय क्रांतीइतकीच कृषिक्रांतीदेखील अत्यावश्यक असल्याची प्रखर जाणीव त्यांना झाली.भारतातल्या शेतकऱ्यांची मर्यादित दृष्टी, मागासलेपण, आधुनिक ज्ञानाचा अभाव यामुळेच बहुसंख्य शेतकरी वंचितच राहतात हे त्यांना कळून चुकले. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर देशाला उपयोगी पडेल असे ज्ञान आतापासूनच मिळवण्याचा दूरचा विचार ते आताच करू लागले. संघटन, अभ्यास आणि लष्करी शिक्षण या सर्व गोष्टी त्यांनी एकाच वेळेस कशा चालू ठेवल्या हे वाचताना थक्क व्हायला होते.

‘गदर’ हे स्वातंत्र्यलढ्यातले १८५७ च्या उठावाप्रमाणे अयशस्वी पण धगधगते पर्व ! या उठावाच्या सूत्रधारांपैकी  अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणजे डॉ. खानखोजे. अमेरिकेत संघटित होऊ लागलेल्या भारतीय क्रांतिकारकांना बॉम्ब बनवणे, गनिमी कावा वगैरेचे प्रशिक्षण सुरु झाले होते. आझाद-ए-हिंद पार्टीची स्थापना करण्यात आली आणि (१९१३ च्या सुमारास) त्यांच्या ‘गदर’ या मुखपत्रामधून कडवे देशभक्तीपर साहित्य प्रसिद्ध होऊ लागले होते. पाहता पाहता पार्टीने बाळसे धरले आणि भारताच्या इतिहासात गाजलेला ‘गदर’ या उठावाचे नियोजन सुरु झाले. बेत फार महत्वाकांक्षी होता. ‘प्रहारक’ विभागातल्या तब्बल १०००० प्रशिक्षणार्थींना भारतात पाठवायची योजना झाली. पण हे यशस्वी व्हायचे नव्हते. फितुरी, कुशल संघटकाचा अभाव, शस्त्रास्त्र तुटवडा अशा अनेक कारणांमुळे भारतातली ब्रिटीशांची सत्ता उलथण्याचा बेत फसला. त्याचवेळेस आलेल्या पहिल्या महायुद्धामुळेही ‘गदर’ ला खीळ बसली. पण खानखोजे हा माणूस सामान्य नव्हताच मुळी ! यानंतरचा खानखोजे यांचा जीवनपट हा अतिशय विलक्षण आहे. आपल्याला सुभाषबाबूंचे भारतातून पलायन आणि मग जर्मनीपासून ते जपानपर्यंतचा त्याचा विलक्षण प्रवास माहित असतो. तितकाच वादळी प्रवास खानखोजेंचाही आहे. पुढे त्यांनी पी.एच.डी. ला रामराम ठोकून ग्रीस, इराण या ठिकाणी आपला कसा मोर्चा वळवला. ब्रिटिशांनी खानखोजे अटक करूनही केली हा पठ्ठ्या त्यातूनही शिताफीने कसा निसटलाएवढेच नाही तर भारतात येऊन तर वेषांतर करून टिळकांची भेट घेऊन ते देशाबाहेर का पडले, पायाला पुन्हा भिंगरीलावून रशियाला का गेले, तसेच जर्मनीतदेखील क्रांतिकार्याचा प्रसार कसा केला हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तकच मुळातून वाचायला हवे.

मेक्सिकोमधले कार्य हे डॉ. खानखोजेंच्या जीवनातले लखलखते पर्व. आपली मातृभूमी नसूनही परमुलखात जाऊन सर्वस्व झोकून केलेले त्यांचे कार्य वाचताना मला सतत चीन युद्धात चीनी नागरिकांची सुश्रुषा करणारे डॉ. कोटणीस यांची आठवण येत होती. मेक्सिकोत त्यांनी मक्यावर संशोधन केले. रबरासंदर्भात संशोधनासाठी दक्षिण अमेरिकेतील जंगलात प्रचंड भटकंती केली. मध्वाली कंदापासून मिळालेले हार्मोन्स नपुंसकत्व कमी करण्यास उपयुक्त असतात हे सिद्ध केले. या सर्व कामांसाठी त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. महान कृषितज्ञ डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांना भेटण्याचा अपूर्व योग हा त्यांना कृतकृत्य वाटायला लावणारा क्षण !

१९४७ साल उलटून गेले होते आणि खानखोजे यांचा एक डोळा अजूनही भारताकडे होता. दरम्यानच्या काळात मेक्सिकोत राहणाऱ्या आणि आपल्यापेक्षा ३० वर्षांनी लहान असलेल्या जीन सिंडिक हिच्याशी डॉ. खानखोजे यांनी विवाह करून मेक्सिको इथेचसंसारही थाटला होता. मेक्सिकोमध्ये सरकारी सल्लागारम्हणूनही त्यांना जबाबदारी मिळाली होती परंतु त्यांना ओढ लागली होती मातृभूमीला भेटण्याची. आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशाला करून देण्यासाठी ते उत्सुक होते. त्यामुळे कुटुंबासह ते भारतात परत आले. परंतु एका अजब प्रकारामुळे स्वतंत्र भारताचे नागरिकत्व लांबणीवर पडण्याचे दुर्दैव त्यांच्या नशिबी आले.  त्यामग पुन्हा मेक्सिको, पुन्हा भारत अशी फिरस्ती. १९६१ साली त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाले. परंतु देश पुढे चालला होता. त्याला डॉ. खानखोजेंच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावासा वाटलाच नाही. देशाच्या कृषिक्षेत्रासाठी झटण्याची त्यांची इच्छा अपुरीच राहिली. 

श्वास रोखून धरायला लावेल असे नाट्य ज्यांच्या आयुष्यात आहे असा असे हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व. इथे उल्लेखलेल्या घटनांव्यतिरिक्तदेखील एवढे काही त्यांनी अनुभवले आहे ते जाणून घेण्यासाठी हे पुस्तकच मुळातून वाचायला हवे. डॉ. जॉर्ज कार्व्हर, सलीम अली या महान, परंतु दुर्लक्षित व्यक्तींची जीवनकहाणी प्रकाशात आणणाऱ्या वीणा गवाणकर यांनी डॉ. खानखोजेंचे अनेक अज्ञात पैलू प्रकाशात आणण्यासाठीही किती कष्ट घेतले याची कल्पनाही आपण करू शकत नाही. एकेक संदर्भ मिळवण्यासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा, दाखवलेली प्रचंड चिकाटी या गोष्टी कळण्यासाठी पुस्तकाची संपूर्ण प्रस्तावना वाचायलाच हवी.अशा थोर व्यक्तीला प्रकाशात आणणे म्हणजे एकप्रकारे त्यांचे आपल्यावरचे ऋण फेडणेच आहे, अशा उदात्त भावनेतूनच हे पुस्तक साकारले असल्याने त्यातले साधे सोपे वर्णन सुद्धा भिडणारे आहे. घडलेल्या घटनांमधून आणि वेळोवेळी खानखोजेंच्या स्वतःच्याच शब्दांतून त्यांच्या ध्यासप्रेरित व्यक्तिमत्वाचा क्रांतिकारक ते कृषितज्ञ-संशोधक हा प्रवास उलगडत नेला आहे.अतिअलंकारिक भाषा किंवा घटनांवर लेखिका म्हणून काही भाष्य करणे या गोष्टी त्यांनी टाळल्या आहेत ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे.

पुस्तकाचे शेवटचे प्रकरण वाचताना लेखिकेप्रमाणेच आपल्याही मनात अपराधी भावना दाटून येते. कारण डॉ. खानखोजेंच्या प्रखर ज्ञानाचा आमच्याच देशबांधवांनी काहीही उपयोग करून घेतला नाही. वृद्धावस्थेतही देशप्रेमापोटी मेक्सिकोमधील सर्व मनाची पदे त्यजून ते भारतात आले आणि केवळ व्यक्तिपूजेपुरतेच आम्ही त्यांचे गोडवे गायले. आपण उत्सवमूर्ती आहोत ही खंत शेवटपर्यंत त्यांना छळत राहिली. ५० वर्षांहून अधिक काळ देशासाठी रक्ताचे पाणी करणारा हा जीव आज कुणाला ठाऊकही नाही ही आपली समाज म्हणून, राष्ट्र म्हणून एक मोठी शोकांतिका आहे. म्हणूनच‘नाही चिरा ..’ हे या पुस्तकाचे उपशीर्षक अतिशय योग्य आहे. बंदुकीच्या रांगांचे हळूहळू पिकांमध्ये होत गेलेले रुपांतर असे अतिशय चपखल मुखपृष्ठ दाद द्यावे असेच आहे. एकूणच अथ पासून इति पर्यंत वाचनीय हे पुस्तक सर्वांनी वाचलेच पाहिजे असे आहे.

 

राजहंस प्रकाशन

पृष्ठे २४०, किंमत १८०,

आवृत्ती चौथी

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.